सामनच्या अग्रलेखात इम्रान खान यांच्यावर निशाणा

शनिवार, 2 मार्च 2019 (08:57 IST)
इम्रान खान याना शांतीदूत व्हायचे स्वप्न पडले काय? असा प्रश्न उपस्थित करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खरोखर शांतता हवी असेल तर त्यांनी आधी भारताविरोधात उठाव करणाऱ्या सगळ्या दहशतवाद्यांना जेरबंद करावे किंवा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईला पाठिंबा द्यावा. एकीकडे इम्रान खान शांततेची भाषा करणार दुसरीकडे मसुद, हाफिज सईदसारखे सैतान आमचे रक्त सांडणार, ही शांतता नाही असंही शिवसेनेने म्हटलं आहे. सामनच्या अग्रलेखात इम्रान खान यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
 
इम्रान खान महाशयांना शांतिदूत व्हायचे स्वप्न पडले आहे काय? पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी युद्धाची भाषा केली नाही. चर्चा करू, चर्चेला तयार आहोत, असे त्यांनी हिंदुस्थानला सांगितले. इम्रान खान यांचे म्हणणे असे की, माझ्याआधी काय झाले ते माहीत नाही. मी नव्या पाकिस्तानची भूमिका मांडतोय. इम्रान खान यांनी पडते घेतले आहे, पण जुन्या पाकिस्तानात जे हाफीज सईद, मसूद अजहर होते तेच आज इम्रानच्या नव्या पाकिस्तानातदेखील दहशतवाद्यांचे कारखाने चालवत आहेत. आमच्या लष्कराने हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. वास्तविक हेच कार्य नव्या पाकिस्तानची वकिली करणाऱ्या इम्रान खान यांनी करायला हवे होते. ‘‘हिंदुस्थानात निवडणुका येत आहेत म्हणून पाकिस्तानला ‘टार्गेट’करू नका, युद्धाचा माहोल करू नका. यात दोन्ही देशांचे नुकसान आहे,’’असे पाकचे पंतप्रधान सांगतात. इम्रानचे हे विधान अगदीच दुर्लक्षित करून चालणार नाही, अशी भूमिका या देशातील काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. मुळात हिंदुस्थानच्या द्वेषावरच पाकिस्तानचे अस्तित्व, राजकारण टिकून आहे. जो हिंदुस्थानला खतम करण्याची भाषा जोरात करेल तोच पाकचा लोकप्रिय नेता ठरतो. हिंदुस्थानातही त्यापेक्षा वेगळे चित्र नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती