राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही स्लिपर क्लास बसच्या तिकीट दरात मोठी कपात करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत आगोदर दिली आहे. त्यामुळे आता नवीन तिकीट दर कमी होण्याचा फायदा सर्वसामान्य प्रवासी वर्गाला आणि सोबतच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार आहे. यामध्ये भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात केली आहे, हे सर्व नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. याबाबत अधिकृत पत्रकाद्वारे एसटी महामंडळाकडून स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळातर्फे राज्यातील विविध महत्वच्या आणि लांब पल्ल्याच्या ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस असून, आता तिकीट दर कमी झाल्याने खासगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा होणार आहे. यामध्ये अधिकाधिक प्रवासी स्वतः कडे खेचण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले असून, तिकीट दर कमी होण्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही आणि दिव्यांग व्यक्तींना होईल असा विश्वास आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी शयनयान प्रवासासाठी एस.टीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.