शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हिंदुत्व आणि भगवा रंग पुसला जाणार नाही, असे सांगितले, ही आनंदाची बाब आहे. उद्धवजींच्या भाषणातील योग्य इशारा समजणाऱ्यांसाठी पुरेसा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजेच हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना समजते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोल्हापुरातील शिवसेनेच्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केले की, ती मते पुन्हा शिवसेनेकडे आणता येणार नाहीत. पालकमंत्री सतेज पाटील यांची पद्धती आहे की, ते संपूर्ण मतदारसंघ ताब्यात घेतील. याचा शिवसैनिकांनी विचार करावा. कोल्हापूरचा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे आणि तो कायमचा काँग्रेसच्या हाती जाऊ नये, असा आमचा आग्रह आहे. आपसातली भांडणे चालू राहिली तरीही हा मतदारसंघ हिंदुत्ववाद्यांकडून निसटू नये.
ते म्हणाले की, कोल्हापुरातील भगवा संपवू नये असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तो भगवा काँग्रेस नाही हे सर्वसामान्यांना कळते. भगवा म्हणजे भाजपा हे सुद्धा लोकांना कळते. समझने वालों को इशारा काफी है. शिवसैनिकांनीही विचार करावा की, भगवा म्हणजे भाजपा की काँग्रेस.
त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या नव्या प्रयोगात, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, शिरोळ अशा एकेक शिवसेनेची परंपरागत ताकद असलेल्या कोल्हापूरमधील जागा जातील. कारण हे मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडणार नाहीत. अशा स्थितीत, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके अशा शिवसैनिकांचा बळी देणार का, असा प्रश्न आहे.