काँग्रेसचेही आमदार फुटणार म्हणाले आदित्य ठाकरे

शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (07:50 IST)
मुंबई : शिवसेनेनंतर आता काँग्रेसचेही नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या आणि काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आदित्य ठाकरे गेले असता माध्यामांनी त्यांना घेरले. त्यावेळी काँग्रेस आमदार फुटण्यावर विचारलं असता “जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही. उत्सवाच्या काळात जो कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळं दिसत आहे.
 
एवढं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा. काही पक्षांकडून सगळीकडे राजकारण होत आहे. हे लोकांना दिसत आहे. ते कुणालाही आवडत नाही. आज आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेत आहोत. हे सगळं त्यांच्या आशीर्वादावरच चाललं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती