खारशेतसह नऊ पाड्यांना मिळणार घरपोच नळाद्वारे पाणी; आदित्य ठाकरे यांनी साधला थेट ग्रामस्थांशी संवाद

बुधवार, 12 जानेवारी 2022 (08:01 IST)
“हे राज्यातील प्रत्येक नागरिकाचे सरकार असल्याची व्यक्त केली भावना”; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ घेतली दखल
  “साहेब, आमच्या माय भगिनीची व्यथा तुम्ही जाणली आणि 24 तासांच्या आत पाणी आणण्यासाठी असणारा लोखंडी पूल तयार झाला. जणू आमचा मरणाकडे जाणारा रस्ता थांबला…” अशा शब्दांत शेंद्रीपाडा.. खरशेतमधील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर तेवढ्याच संवेदनशीलतेने उत्तर देत, “हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे सरकार आहे. त्याच्याप्रती असणारी आमची बांधिलकी कायम राहील” असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. जलजीवन मिशन अंतर्गत खरशेत आणि लगतच्या 9 पाड्यांना जून महिन्या अखेरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील खरशेत (ता. त्र्यंबकेश्वर) येथील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी कसरत काही माध्यमातून समोर आली होती. त्याची तात्काळ दखल घेत पर्यटनमंत्री श्री. ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी, तेथे पाण्यासाठी जाणाऱ्या महिलांना रस्ता तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची दखल घेत यंत्रणांनी केवळ 24 तासांत तेथे लोखंडी पूल उभारुन व्यवस्था केली होती. त्याचबरोबर, हे गाव जल जीवन मिशन मध्ये ही समाविष्ट आहे. त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत खरशेत येथील ग्रामस्थांनी मंत्री श्री. ठाकरे आणि मंत्री श्री. पाटील यांनी ऑनलाईन संवाद साधला. राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलजीवन मिशन कक्षाचे प्रमुख ह्षीकेश यशोद यांच्यासह नाशिकहून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, इतर वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
 
जलजीवन मिशन अंतर्गत खरशेत ग्रामपंचायत येथे विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या असून खरशेत आणि सावरपाडा आणि आसपासच्या वाड्यांवर नळपाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण होऊन कामांना सुरुवात केली जाणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वानंतर खऱ्या अर्थाने खरशेत, सावरपाडा आणि आसपासच्या पाड्यांवरील पाण्यासाठीची महिलांची होणारी वणवण थांबणार आहे.
यावेळी पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांनीही ग्रामस्थांशी साधलेल्या संवादात जनतेची सेवा ही महत्त्वाची मानून काम करीत असल्याचे सांगितले. पाणी हे जीवन आहे. त्याच्यासाठीचा संघर्ष कमी करणे, त्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. आमचे सरकार हे काम करीत असल्याचे ते म्हणाले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनीही, जलजीवन मिशनच्या माध्यमातून टंचाई जाणवणाऱ्या भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. खरशेतची व्यथा जाणून 24 तासांच्या आत तेथे यंत्रणेने लोखंडी पूल उभारला. यापुढील काळात प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असे सांगितले.
 
जलजीवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनांमध्ये खरशेत व 5 वाड्या (खरशेत, जांभुलपाडा, फणसपाडा, शेंद्रीपाडा, पांगुळघर, कसोलीपाडा) नळपाणीपुरवठा आणि सावरपाडा व 3 वाड्या (सावरपाडा, सादडपाडा, वालीपाडा, मुरुमहट्टी) यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत ही योजना पूर्ण केली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती