राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शनिवारी (17 डिसेंबर) मुंबईत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.
या मोर्चासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पानावर वाचायला मिळतील.
महाविकास आघाडीचा मोर्चाबद्दल थोडक्यात -
* मोर्चा कशासाठी? - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ
* कोणते पक्ष सहभागी? - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर पक्ष
* कोणते नेते येणार? - शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण.
* कार्यकर्ते कुठून येतील? - मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे आणि नाशिकमधील कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश
* वेळ काय? - सकाळी 11 वाजता
* मोर्चाचा मार्ग काय? - दक्षिण मुंबईत भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यानापासून ते टाईम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत (CSMT रेल्वे स्टेशन समोर)
* भाषणे कुठे होतील? - CSMT रेल्वे स्टेशन समोर एका ट्रकमध्ये नेत्यांची भाषणे होतील.
महाविकास आघाडीचा मोर्चा कसा असेल?
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं याबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष असून त्यासाठीच महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.
या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या,” असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.“हीच वेळ आहे जागं होण्याची आणि महामोर्चात सहभागी होण्याची,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे असे नेते उपस्थित राहणार आहेत.
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीने आपल्या बैठकीत तिन्ही पक्षांना मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना जमवण्याचा आदेश दिले आहेत.मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यातूनही कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबईत भायखळा पासून ते टाईम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत (सीएसएमटी रेल्वे स्टेशन समोर) महाविकास आघाडीचा मोर्चा आहे.
महाराष्ट-कर्नाटक प्रश्नी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्त्वात एक बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमाभागासंदर्भात केलेली वक्तव्य आपली नसून ते ट्वीट त्यांनी केलं नाही असं स्पष्ट केलं. परंतु यावरून महाविकास आघाडीने भाजप सरकारवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “बसवराज बोम्मई यांच्या नावाने ज्या ट्वीटर खात्यावरून चिथावणीखोर ट्वीट करण्यात आले ते खातं बनावट होतं. हा खुलासा करण्यास एवढे दिवस का लागले? आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि हे केवळ ऐकून आले आले.”
शनिवारी (17 डिसेंबर) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रामुख्याने या मुद्यांवर घोषणाबाजी केली जाईल. तसंच प्रमुख नेते या मुद्यांवरूनच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील.
भाजपचं माफी मांगो आंदोलन
* महाविकास आघाडीच्या पाठोपाठ आता भाजपनेही शनिवारी (17 डिसेंबर) आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
* “गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांची वक्तव्ये समाजमाध्यमांवर येत आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि वारकरी यांचा अपमान केला जात आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान समोर आल्यानंतरही उद्धव ठाकरे मौन सोडायला तयार नाहीत.”
* शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावरचा वाद निर्माण केला जात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे का करत आहे?” असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.
* मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्ते संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध नोंदवतील, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
मुंबईकरांसाठी सूचना
* मुंबई पोलिसांनी काही अटी-शर्थींसह महाविकास आघाडी आणि भाजपच्या आंदोलनाला परवानगी दिली आहे.
* विरोधकांनी आपला मोर्चा शांततेत काढावा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवावी, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
* महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी 11 वाजता भायखळा येथून सुरू होईल. त्यानंतर जिजामाता उद्यान मोहम्मद अली रोड ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघेल.
* महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रमुख नेत्यांसाठी एक ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर या ट्रकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.
* या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत सकाळच्या सत्रात काही मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्याची शक्यता आहे.
* तसंच ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याने शनिवारी सकाळी इस्टर्न एक्सप्रेस हायवे, पनवेल आणि ठाण्यातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोडींची शक्यता नाकारता येत नाही.
* त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासाचं नियोजन त्यानुसार करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.