आरे मेट्रो कारशेड : मनसे विरुद्ध मुंबई मेट्रो, सोशल मिडीयावर शाब्दिक युद्ध

बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (15:31 IST)
मुंबई येथे आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आता मनसे विरुद्ध मुंबई मेट्रो असा जोरदार वाद सुरु झाला आहे. आरेमध्ये कारशेड उभारल्याशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊच शकणार नाही, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केला होता. मात्र हा दावा तर्कशुद्ध वाटत नसल्याचं मनसेनं म्हटलं आहे. त्या दोघांमध्ये आता सोशल मिडीयावर शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. 
 
अश्विनी भिडेंनी केलेल्या युक्तिवादावर मनसे नेते अनिल शिदोरेंनी निशाणा साधला. 'अडीच हजार झाडं तोडल्याशिवाय मेट्रो प्रकल्प होऊच शकत नाही हे तुमचं म्हणणं तर्कशुद्ध वाटत नाही. मूळ प्रकल्पाच्या संकल्पनेतच गफलत आहे. कमीत कमी झाडं तोडली जातील या विचारानं तुम्ही प्रकल्प आखलेला नाही. आधी प्रकल्प आखला आणि नंतर झाडं कशी वाचणार असं पहाता आहात,' अशा शब्दांमध्ये शिदोरेंनी भिडेंना उत्तर दिलं.
 
मनसेच्या टीकेला अश्विनी भिडेंनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझं म्हणणं जर तर्कशुद्ध नसेल, तर मुंबईत वेगवेगळ्या गृहप्रकल्पांसाठी व अन्य प्रकल्पांसाठी दिलेल्या वृक्षतोड परवानग्यादेखील तर्कशुद्ध नव्हत्या, हेही ठासून सांगायला हवं होतं. किंबहुना आता एकही वृक्ष तोडायचा नाही. भले आवश्यक एकही प्रकल्प आणि गृहनिर्मिती झाली नाही तरी चालेल हीच भूमिका घ्यावी,' असं भिडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती