जुन्या पेन्शनला विरोध करत इशारा देणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

शुक्रवार, 17 मार्च 2023 (09:28 IST)
जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला समाजातील विविध स्तरातून विरोध होत आहे. विरोधाच्या या वातावरणात आता सुशिक्षित बेरोजगार युवक युवती देखील आक्रमक होताना दिसत आहेत. कोल्हापुरात बुधवारी एका व्हायरल झालेल्या मेसेजने खळबळ उडवून दिली. अगदी संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या छातीत धडकी भरावी असा इशारा देणारा आशय या व्हायरल मेसेज मध्ये आहे.
 
शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा या व्हायरल मेसेज मध्ये देण्यात आला आहे. इशारा देत असतानाच या मेसेजमध्ये संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली असून जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा असे आवाहनही करण्यात आले आहे.
 
“आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावर काम करायला तेही विना पेन्शन’, अशी भावना मांडत जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण मोर्चात सहभागी होऊया. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक युतीने उपस्थित राहावे, असे आवाहन करताना खास कोल्हापुरी भाषेत मी येतोय तुम्ही पण या, यायला लागतंय, असेही या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.
 
मोर्चा निघाला तर….?
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपातून माघार घेण्याचा निर्णय बुधवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. आता व्हायरल मेसेज प्रमाणे जर शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा मोर्चा निघाला तर तो देखील राज्य सरकारला आवाहन, विनंती करणारा आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आव्हान देणारा ठरेल अशी चर्चा आहे.
 
मेसेज कुणी पाठविला?
शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीला विरोध करत सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना थेट रस्त्यावर उतरवून मोर्चा काढण्याचे नियोजन कोणी केले आहे. त्यामागचा सूत्रधार कोण आहे?, याबाबत हा मेसेज व्हायरल झाल्यानंतरही सर्व नेटकरी अनभिज्ञ होते. त्यामुळे या मेसेजच्या सत्यतेविषयी माहिती मिळू शकली नाही. तरीही या मेसेजने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ढवळून काढला. राज्यभरही या मेसेजची चर्चा होती. प्रत्यक्षात उद्या कोणी पुढे होऊन या व्हायरल मेसेजची सत्यता सांगणार का ? , मोर्चा विषयी अधिकृत माहिती देणार का? आणि प्रत्यक्षात मोर्चा निघणार का?, असे अनेक प्रश्न या व्हायरल मेसेजच्या निमित्ताने पुढे आले आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती