छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अपमान अजिबात सहन करणार नाही, दोन दिवसात याबाबतचं पुढचं पाऊल काय असेल हे सांगितलं जाईल, असंही राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
राऊत यांनी यावेळी त्यांच्या अटकेमागेही अशीच एक स्क्रिप्ट लिहिली गेली होती, असा आरोप केला आहे. "प्रत्येकवेळी कोणत्याही तरी वादग्रस्त विधानावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपाकडून स्क्रिप्ट लिहिली जात असते. यांचं सारं काही स्क्रिप्टेड असतं. मुंबईतून गुजराती, मारवाडी गेले तर हे शहर देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, मराठी माणसांना कुणी विचारणार नाही असं विधान याआधी याच राज्यपालांनी केलं होतं. त्यावेळी त्यावरुन जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतला अटक केली गेली", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.