दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू

शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (15:40 IST)
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेसह सहा वर्षीय लहान मुलाचाही समावेश असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील मेहकर शहरात ही घटना घडली. मृतांमध्ये पती, आठ महिन्यांची गर्भवती पत्नी आणि एका सहा वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. शेख असिफ शेख अशरफ (वय 28), शाहिस्ता बी शेख असिफ (वय 25)आणि जुनेद शेख असिफ (वय 6)अशी मृतांची नावं आहेत. मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात राहणारं शेख कुटुंब गुरुवारच्या रात्री (19 सप्टेंबर) गाढ झोपेत असताना अचानक घराशेजारील घराची भिंत कोसळली. या अपघातात शेख कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. या सर्व जखमींवर सध्या मेहकरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी दिवसभर बुलडाणा जिल्ह्यात पाऊस सुरु होता. नंतर रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील मेहेकर येथेही मुसळधार पाऊस सुरु होता. रात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास हे कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक त्यांच्या घराशेजारील घराची जूनी मातीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने कुटुंबातील सर्वच पाचजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. मोठा आवाज झाल्याने शेजारी जागे झाले आणि ते शेख कुटुंबाच्या मदतीला धावून आले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलीस आणि नागरिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेख कुटुंबियांना बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथे डॉक्टरांनी पाचपैकी तिघांचा मृत्यू झाल्याचं कळवले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती