नवरीसाठी लग्नाळू मुलांचा मोर्चा; 'गावात राहतो, शेती करतो म्हणून 30 जणींनी नकार दिला'
रविवार, 12 मार्च 2023 (16:08 IST)
डिसेंबर 2022 मध्ये राज्यातील सोलापूर जिल्ह्यात एक अनोखा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा होता लग्नाळू तरुणांचा.लग्नासाठी मुलींची स्थळं मिळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात लग्नाळू तरूणांनी नवरी मिळण्यासाठी नवरदेव बनून जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला होता.
लग्नाळू तरूणांनी स्वतः नवरदेवाचा पोशाख घालून डोक्याला मुंडावळ्या आणि फेटा बांधून, हातात कट्यार घेऊन आणि घोड्यावर बसून वरातीला साजेल असा मोर्चा काढला. वाजंत्रीसह निघालेल्या या मोर्चात 25 पेक्षा जास्त लग्नाळू तरूण घोड्यांवर बसले होते. त्याहून अधिक तरूण नवरदेव होऊन पायी चालत होते.
मागच्या महिन्यात असाच एक लग्नाळू तरुणांचा मोर्चा कर्नाटक राज्यात काढण्यात आला होता. आपल्याला एखादी सुस्वरूप पत्नी मिळावी म्हणून कर्नाटकातील काही तरुणांनी देवाला साकडं घालण्यासाठी 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराच्या दिशेने कूच केली होती.
त्यांच्या या प्रयत्नांची सोशल मीडियावर टर उडविण्यात आली. मात्र हा सामजिक प्रश्न दिवेसंदिवस गंभीर होत चाललाय.
देवाला घातलेलं साकडं पूर्ण होईल असं वाटतं
या पदयात्रेत 30 तरुण सहभागी झाले होते, मात्र मोर्चा संपताना ही संख्या 60 वर गेली. हे सर्व तरुण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील शेतकरी होते. या भागात मुलींचा जन्मदर घटल्यामुळे लिंग गुणोत्तर विस्कळीत झालं आहे.
या पदयात्रेत सहभागी झालेले तरुण सांगतात, यामुळे बऱ्याच पुरुषांची लग्नं खोळंबली आहेत. घटत चाललेलं शेतीचं उत्पन्न आणि नव्या पिढीतील मुलींच्या वाढत्या अपेक्षा यामुळे लग्न करणं कठीण झालंय.
ब्रह्मचारिगालू नावाच्या या पदयात्रेत सहभागी झालेले मल्लेश डीपी या तरुणाला वाटतं की, त्यांनी देवाला घातलेलं साकडं पूर्ण होईल.
तो सांगतो, "जेव्हा मी प्रेमात पडायला पाहिजे होतं तेव्हा मी पैसे कमावण्यात व्यग्र होतो. आता माझ्याकडे पैसे आहेत, सर्वकाही आहे, पण लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये."
33 वर्षांचा मल्लेश सांगतो की, लग्नासाठी जे आदर्श वय असावं लागतं ते मी ओलांडलंय.
या पदयात्रेच्या आयोजकांपैकी एक असलेले शिवप्रसाद केएम सांगतात, जेव्हा आम्ही असा मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा केली होती तेव्हा जवळपास 200 हून अधिक तरुणांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता.
ते सांगतात, "पण स्थानिक मीडियाने आमचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने पुढं आणल्यामुळे अनेक जण यातून बाहेर पडले."
मंड्या जिल्हा सिंचनाखाली असल्याने हा पट्टा सुपीक आहे. इथे प्रामुख्याने ऊसशेती केली जाते. पण घटत चाललेल्या उत्पन्नामुळे लोकांनी शेती करणं सोडून दिलंय.
या मोर्चात सहभागी झालेला 31 वर्षीय कृष्णा म्हणतो, "तरुण शेतकऱ्यांचं उत्पन्न अनिश्चित असतं असं लोकांना वाटतं "
मल्लेश सांगतो की, गेल्या काही वर्षांत त्याला सुमारे तीस महिलांनी लग्नाला नकार दिलाय. ग्रामीण भागात राहतो आणि शेती करतो म्हणून बऱ्याचशा स्त्रियांनी नकार दिलाय.
शिवप्रसाद सांगतात, "आमच्या भागात जमिनी कमी आहेत आणि कमाई देखील फारशी नाही. पण जे लोक इतर व्यवसायातून पैसे कमावतात त्यांची स्थिती चांगली आहे."
या लग्नाळू तरुणांचा मोर्चा मंदिरात जात असताना शेजारीच उसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं.
शेतकरी नेते असलेले दर्शन पुट्टनय्या सांगतात, "शेतीचा उत्पादन खर्च वाढलाय हे कोणालाच समजत नाही."
लिंग गुणोत्तराची समस्या
सध्याच्या या असमतोलासाठी तरुणांनी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार धरलंय. ज्यावेळी राज्यातील लिंग गुणोत्तरात असमानता आली त्याच दरम्यान या तरुणांचा जन्म झाला होता.
1994 मध्ये गर्भलिंग तंत्रनिदान चाचणीवर बंदी घातल्यानंतरही या भागात गर्भपात होतच राहिल्याचं स्थानिक कार्यकर्त्या असलेल्या नागरेवक्का सांगतात.
त्या म्हणातात, "आजही तुम्ही शेजारी असलेल्या प्ले स्कूलमध्ये जाल तर तुम्हाला 20 मुली आणि 80 मुलांचा पट आढळेल."
शेवटच्या उपलब्ध जनगणना आकडेवारीनुसार 2001 मध्ये मंड्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 971:1000 इतकं होतं. 2011 मध्ये हेच गुणोत्तर 1,000 पुरुषांमागे 960 महिला इतकं होतं.
आता मुलींच्या आवडीनिव़डी, पसंतीक्रमही बदलत आहेत.
मूळच्या मंड्याच्या असलेल्या पण सध्या कुटुंबासह बेंगळुरू शहराच्या बाहेर राहणाऱ्या जयशीला प्रकाश सांगतात, “मला स्वतःला खेड्यात राहणं आवडतं. कारण निसर्गाच्या सानिध्यात राहून लोकांशी बंध निर्माण करणं सोपं असतं.”
पण तरीही त्यांच्यासारख्या महिला शहरांच्या दिशेने वळतात, कारण शहरं जगण्याचं स्वातंत्र्य देतात.
त्या सांगतात, "जर एखाद्या स्त्रीने शेतकरी कुटुंबात लग्न केलं, तर तिला बरेचदा बाहेर जाण्यासाठीही तिच्या पतीची परवानगी घ्यावी लागेल. आजच्या पिढीला कोणावरही विसंबून राहायला आवडत नाही."
पण मंड्यामध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचं मल्लेशा सांगतो.
तो सांगतो, "आमच्या घरातील महिलांना गुरेढोरे, मोठं कुटुंब या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. आमच्या घरात चारच लोक असून त्यांचाच स्वयंपाक करावा लागेल."
शिवप्रसाद सांगतात की, तीन दिवस चाललेल्या मोर्चानंतर, त्यांना आंध्रप्रदेश आणि केरळसारख्या शेजारील राज्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे मॅसेज आलेत.
आपलं नशीबही बदलेल अशी या तरुणांना आशा आहे.
मल्लेश सांगतो, "एवढं चालणं खरोखरच खूप अवघड आहे. सर्वांचं लग्न होऊ दे म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे."