महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षापासून प्रचंड उलथापालथ सुरू आहे. आधी शिवसेना (शिंदे गट) नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आता महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचा दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसमधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. हा गट मोठा निर्णय घेऊ शकतो असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, विरोधीपक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. ते वेगळा विचार करू शकतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार तर त्यांच्या नाहीयेत, पण आमदार महायुतीमध्ये नक्की सहभागी होतील. आता नेमका आकडा मला माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार आहे.”, असा दावा जाधव यांनी केला आहे.