८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेस विधानभवन येथे प्रारंभ

शनिवार, 27 जानेवारी 2024 (09:23 IST)
मुंबई : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद व भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६० वी परिषद विधानभवन, मुंबई येथे २७, २८ आणि २९ जानेवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रामध्ये याआधी २००३ साली ही परिषद मुंबईत घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी महाराष्ट्राला ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे. या परिषदेसाठी भारतातील सर्व विधानसभांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच काही राज्यांमधील विधानपरिषदांचे सभापती व उपसभापती यांच्यासोबत सर्व विधिमंडळ सचिवांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत संसदीय लोकशाही आणि विधिमंडळ कामकाजाशी निगडीत विविध मुद्यांवर विचारमंथन होईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली.
 
या तीन दिवसांच्या परिषदेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दि.  २७ रोजी प्रारंभ होईल. मा. पीठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेबरोबरच भारतातील विविध राज्यातील विधिमंडळ सचिवांची ६० वी परिषद देखील यावेळी संपन्न होईल. या परिषदेत “विधानमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे” या विषयावर विचारमंथन होईल. पीठासीन अधिकारी परिषदेत
 
१) लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी – संसद आणि राज्य / केंद्रशासित प्रदेशांतील विधिमंडळांमध्ये शिस्त आणि शिष्टाचार राखण्याची गरज
 
२) समिती पद्धती अधिक हेतुपूर्ण आणि परिणामकारक कशी करता येईल?  या विषयांवर चर्चासत्र होईल.
 
दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचा समारोप होईल. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर तसेच लोकसभेचे अध्यक्ष आणि या परिषदेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस यांचेही मार्गदर्शन होईल. या परिषदेच्या समारोपानंतर या परिषदेतील आढाव्याची माहिती सर्वांना अवगत करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व प्रसार माध्यमांशी संवाद साधतील.

Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती