विहिरीचं पाणी प्यायल्याने मेळघाटातल्या 4 जणांचा मृत्यू, गावात नेमकं काय घडलं?
सोमवार, 11 जुलै 2022 (22:55 IST)
.
गावातला पाणी-पुरवठा का खंडीत झाला? सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे हे झालं का याची चौकशी सुरू आहे.
'प्रशासनाने आमच्या गावात शुद्ध पाण्याची व्यवस्था करून द्यावी. दरवर्षी आमच्या गावात रोगराई पसरते. रोगामुळे यावेळी चार जणांचा मृत्यू झाला आहे. माझ्या घरच्या म्हाताऱ्याचाही मृत्यू झालाय,' दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्या सुखलाल जामुनकर यांची सून सांगत होती.
पाचडोंगरी गावच्या सुखलाल जामुनकर यांचं वय 76 वर्षं होतं. त्यांना उलटी, हगवण अशी लक्षणं सुरू झाली होती. पण योग्य उपचाराअभावी त्यांचा गावातच मृत्यू झाला.
चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी या गावात दूषित पाणी प्यायल्याने सुखलाल जामुनकर यांच्यासह गंगाराम धिकार (25), सविता अखंडे (27 ), आणि मनिया उईके (75 ) या चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मेळघाट पुन्हा चर्चेत आलंय.
पाचडोंगरी व कोयलारी या दोन्ही गावामध्ये साथीच्या आजाराचे जवळपास 400 रुग्णं आढळून आले आहेत. यापैकी जवळपास 100 रुग्णांवर चुरनी, काठकुंभ, अचलपूर, अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. मात्र परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही आणि लक्षणांवरून ही कॉलराची साथ असल्याचं चुरणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदेव वर्मा यांनी सांगितलं.
जीवघेणी ठरली विहीर
अमरावतीपासून साधारण 150 किलोमीटर अंतरावर पाचडोंगरी आणि कोयलारी ही डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली आदिवासी गावं आहेत.
दोन्ही गावांची लोकसंख्या 2500 च्या जवळपास आहे. पाचडोंगरी ही गट ग्रामपंचायत आहे.
पिण्याच्या पाण्याने निर्माण केलेल्या संकटामुळे गावात भयाण शांतता होती. रुग्णवाहिकेचा आवाज गावात घोंगावत होता. काही महिला, पुरुष टँकरने पाणी भरत असल्याचं दृश्य गावात गेल्यावर आम्हाला दिसलं.
गावातले स्थानिक रहिवासी धनराज आमोदे आम्हाला भेटले. ज्या विहिरीतलं पाणी प्यायल्याने गावकरी आजारी पडले, त्या विहिरीचा पत्ता आम्ही त्यांना विचारला. ते थेट आम्हाला विहिरीवर घेऊन गेले.
गावापासून काही अंतरावर ती पडीक विहीर होती. जवळपास 40 फूट खोल विहीर असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. या उघड्या विहिरीला कठडा नव्हता. त्यामुळं पावसाचं पाणी, नाला आणि गावातील सांडपाणी, कचरा घेऊन विहिरीत साचलं असावं, असं धनराज यांनी सांगितलं.
ते म्हणाले "गावकरी या पडीक विहिरीतलं पाणी प्याले आणि ही वेळ आली. हे असं दर वर्षी होतं. पण यंदा फारच वाईट स्थिती आहे. चिखलदरा तालुक्यात पाणी टंचाईसाठी आमचं गाव पहिल्या क्रमांकावर आहे. गावकऱ्यांना अजूनही लांबून पाणी आणावं लागतं. गावात पाण्याच्या सगळ्या योजना बाद झाल्या आहेत" आमोदे सांगत होते.
विहिरीला सील करण्यात आलं
गावात नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू होता म्हणून विहिरीची साफ-सफाई झाली नव्हती.
आता दूषित पाण्याच्या त्या विहिरीला सील करण्यात आलंय. विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नाही, असा बोर्डही जवळ लावला गेलाय. गावाला सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.
गावातल्या रहिवासी निर्मला असोटे सांगत होत्या कीस "आम्ही कोयलारी या गावातून पाणी आणत होतो. त्यामुळं आम्ही आजारापासून बचावलो. गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. काही दिवस नळाद्वारे पाणी आलं. पण गेल्या पाच दिवसांपासून नळ बंद होता. तरी त्या विहिरीचं पाणी आम्ही प्यायलो नाही" निर्मला म्हणाल्या.
संसर्गजन्य आजाराचे दोन्ही गावांमधील जवळपास 400 रुग्ण आढळून आले आहेत. अत्यवस्थ रुग्णांना चुरणी या हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार मिळाल्याने सहा जणांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालंय, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
चुरणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदेव वर्मा म्हणाले "आमच्याकडे 43 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 6 रुग्ण गंभीर होते. सेंट्रल लाईन उपचार पद्धतीनं त्यांचे प्राण वाचवण्यात आले. आताही परिस्थिती खूप चांगली आहे असं म्हणू शकत नाही. पण पूर्वीपेक्षा चांगली आहे. आम्ही कॉलरावर उपचार देतोय. कॉलरामध्ये हगवण आणि उलट्या अशी गंभीर लक्षणं आढळून येतात" वर्मा म्हणाले.
नळाचं पाणी का बंद झालं?
डॉक्टर वर्मा यांच्या माहितीनुसार उपचारासाठी दाखल झालेल्या अनेकांना जर तातडीने उपचार मिळाले नसते तर मृत्यूंची संख्या वाढली असती.
पाचडोंगरी गावात शासकीय विहीरीसह 3, तर कोयलारी गावामध्ये एकूण 5 विहिरी आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पण ज्या विहिरीतून गावकरी पाणी प्याले, त्या विहिरीला ब्लिचिंग करण्यात आलं नव्हतं अशी माहिती आहे.
पाचडोंगरी आणि कोयलारी गावामध्ये पाण्याचे स्त्रोत नाहीत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं डोमा या गावातील विहिरीवरून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जायचा. पाइपलाइन आणि दोन्ही गावामध्ये पाणी पोहचवण्यासाठी योजनेवर जवळपास 70 लाखांपेक्षा अधिकचा खर्च झाला.
मात्र जेव्हापासून योजना अंमलात आली तेव्हापासून महिनाभरही पाणी मिळालं नाही आणि पाणी बंद झालं अस गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
कोणाचं निलंबन, कोणावर कारवाई?
ही योजना कोयलारी ग्रामपंचायतीला हस्तांतर करण्यात आली नव्हती असं ग्रामसेवक विनोद सोळंके म्हणाले. ते म्हणाले "आम्हाला 50 हजाराच्या जवळपास बिल आलं. ते सरपंचाच्या नावाने आलं होतं. पण गावांना होणारा पाणीपुरवठा हा टेस्टिंग स्वरूपाचा होता. त्यामुळं इतकं बिल कशामुळे आले याची कल्पना नाही."
पाणी पुरवठ्याच्या प्रकरणात हलगर्जी केल्याचा आरोप झाल्याने दोषी ठरवत विनोद सोळंके यांना प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी घटनास्थळी भेट दिली. दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. विस्तार अधिकारी रमेश मेश्राम आणि गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पंडा म्हणाले, "पाणी पिण्यायोग्य नाही. तरीही ते पाणी पिण्यात आले. ज्यांचा हलगर्जी पणा असेल त्यांच्यावर कारवाई केली आहे. गावामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. योग्य उपचार सुरू असून आम्ही चौकशी करतोय.
"घटनेचं गांभीर्य पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली," असे पंडा म्हणाले.
गावात सध्या शोकमग्न वातावरण आहे. पाणीपुरवठा खंडीत झाला नसता तर चार गावकऱ्यांचा जीव वाचला असता, अशी लोकांची भावना आहे.