नाशकात विद्यार्थ्यांना मौजमजा पडली महागात

बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (08:37 IST)
नाशिक : नाशिकमध्ये चोरीच्या घटना वाढत आहे. त्यात मोबाईल चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार वाढले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान मोबाईल चोरीचा एक धक्कादायक प्रकार नाशिक शहरातून समोर आला आहे. कोणत्याही चोरी मागे अनेक कारण असून शकतात. मात्र या चोरी मागील कारणाने नाशिककरांना थक्क करून सोडले आहे.
 
मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने बेड्या ठोकत त्यांच्याकडून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचे २२ मोबाईल जप्त केले आहे. विशेष म्हणजे हे संशयित महाविद्यालयात शिक्षण देखील घेत आहे. विद्यार्थ्यांनी चोरी केल्याच्या या प्रकारात चोरीचे कारण समोर आले आहे. केवळ मौज मजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची माहिती आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोबाईल खेचून जबरी लूटीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटना लक्षात घेता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सिडको येथील शांती नगर भागात राहणार संशयित चेतन निंबा पवार, पौर्णिमा बस स्टॉप परिसरात राहणारा संशयित शशिकांत सुरेश अंभोरे, जुने सिडको परिसरात राहणारा विजय सुरेश श्रीवास्तव या संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसुन चौकशी केली. त्यांच्याकडून शहर परिसरातून चोरलेले एकूण २२ मोबाईल आणि चोरीच्या वापरलेली दुचाकी असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
संशयितांकडून आडगाव २, सातपूर २, मुंबई नाका आणि सरकारवाडा पोलीस ठाणे १ अश्या ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. मौजमजा करण्यासाठी हे संशयित मोबाईल चोरी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मौजमजेची वाढलेले प्रमाण त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाताना दिसत आहे.
 
हे विद्यार्थी रस्त्याने पायी चालत मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या हातातील मोबाईल दुचाकीवर येऊन बळजबरीने हिसकावून पोबारा करायचे. अखेर चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कामगिरी केली असून त्यांच्याकडून ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. सुमारे साडेचार लाखांचा मुदेमाल जप्त केला असून चौकशीतून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. पोलीस पथकाने त्यांना सापळा रचून जेरबंद केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती