मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी दोन हजार भाविक आजारी पडले. त्यांना उलट्या, चक्कर येणे, मळमळ आणि जुलाब होऊ लागले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात जागेअभावी अनेकांना जमिनीवर पडून उपचार करावे लागले.
कोष्टवाडी येथील बाळुमामा मेंढ्या गावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात स्थानिक लोकांसोबतच आजूबाजूच्या सावरगाव, पोस्टवाडी, रिसनगाव, मस्की गावातील लोकही जमले होते आणि सर्वांनी जेवण केले होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाप्रसाद घेणार्या शेकडो लोकांना बुधवारी पहाटे उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी येऊ लागल्या. सुरुवातीला नांदेडच्या लोहा उपजिल्हा रुग्णालयात 150 जणांना दाखल करण्यात आले. नंतर इतर लोकांनाही अशाच आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णांचे नमुने अन्नातून विषबाधा तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बाधित गावांमध्ये सर्वेक्षणासाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथकही तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात येत आहे.