गाझियाबादच्या लोनी येथील ट्रॉनिका सिटी पोलीस स्टेशन परिसरात गेल्या 21 डिसेंबरच्या रात्री एका वृद्ध जोडप्याची हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा कट एका 12 वर्षांच्या मुलाने रचल्याचा खुलासा केला आहे.पैशाच्या लालसेपोटी अल्पवयीन मुलाने दुहेरी हत्याकांडाची ही खळबळजनक घटना घडवली होती.
पोलिसांनी बाल आरोपीसह त्याच्या इतर दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्याचा एक साथीदार अद्याप पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. ट्रॉनिका सिटी परिसरात 21 डिसेंबरच्या रात्री उशिरा इब्राहिम आणि त्याची पत्नी हाजरा या वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह त्यांच्याच घरात सापडले. दोघांचीही गळा आवळून हत्या करण्यात आली होती, सोबतच घरात लुटल्याची घटनाही घडली होती.
मृतक दाम्पत्य इब्राहिम आणि हाजरा हे भंगाराचे काम करायचे. त्याच्या हत्येचा कट रचणारा 12 वर्षीय मुलगाही त्यांच्या कडे रद्दी विकण्यासाठी येत होता.घटनेच्या एक दिवस आधी वृद्ध जोडप्याने मोठ्या प्रमाणात रद्दी विकल्याचे अल्पवयीन मुलाने पाहिले. वृद्ध जोडप्याने मोठी रक्कम ठेवली असावी, असे त्याला वाटले.यानंतर त्याने त्याच्या अन्य 3 साथीदारांसह हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी 12 वर्षांचा मुलगा आणि त्याचे इतर तीन साथीदार वृद्ध जोडप्याच्या घरी पोहोचले होते. रद्दी विकायची असे सांगून अल्पवयीन आरोपीने गेट उघडवले. वृद्ध महिलेने दरवाजा उघडला.
सकाळी वृद्ध दाम्पत्याच्या नातेवाइकांनी जाऊन पाहिले असता त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. तेव्हापासून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत होते. पोलिसांनी हत्येमध्ये सहभागी असलेल्या 12 वर्षीय आरोपीला तसेच त्याच्या इतर दोन आरोपींना अटक केली आहे. दुसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दाम्पत्याची हत्या करून लुटलेला मोबाईल आणि चांदीची चेन जप्त करण्यात आली आहे.