शेतजमिनीवरील आरक्षण काढण्याचे आमिष दाखवून वृद्धेला ११ लाख रुपयांचा गंडा

गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (21:13 IST)
शेतजमिनीवर मालेगाव मनपाने टाकलेले आरक्षण काढण्याचे आमिष दाखवून बीडच्या भामट्याने वृद्ध महिलेला 11 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कुसुम जिभाऊ बच्छाव (वय 72) या रामवाडीतील बच्छाव हॉस्पिटल येथे राहतात. बच्छाव यांची मालेगाव कॅम्प येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर मालेगाव महानगरपालिकेने आरक्षण टाकले आहे. ही संधी साधून आरोपी युवराज भीमराव पाटील (वय 55, रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) याने कुसुम बच्छाव यांच्याशी संपर्क साधला.
 
शरणपूर रोडवरील रचना शाळेजवळ संजय सोनवणे यांच्या राहत्या घरी दि. 22 ऑक्टोबर 2021 ते दि. 13 सप्टेंबर 2023 या कालावधीत आरोपी युवराज पाटील याने फिर्यादी कुसुम बच्छाव यांना मालेगाव कॅम्प येथील शेतजमिनीवर मालेगाव मनपाने टाकलेले आरक्षण काढण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी पाटील यांच्याशी आरक्षण काढून देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यादरम्यान आरक्षण काढून देण्याच्या आमिषाने पाटील याने फिर्यादी बच्छाव यांच्याकडून वेळोवेळी रोख व बँक ट्रान्स्फरद्वारे 11 लाख रुपये स्वीकारले; मात्र बरीच वर्षे उलटूनही जमिनीवरील आरक्षण काढले नाही.
 
याबाबत बच्छाव यांनी आरोपीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे काढण्यास नकार दिला. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुसुम बच्छाव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात युवराज पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती