पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच राजूर घाटातून दुपारी जात होती. दरम्यान राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी ते थांबले असता त्यांच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरा मागील दरी नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केल्याचे यासंदर्भातील पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. पीडित महिला व तिच्या समवेत असलेला व्यक्ती राजूर घाटात देवीच्या मंदिरानजीक सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील ४५ हजार रुपये लुटले. सोबतच महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. सोबतच पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या घटनेची माहिती अन्य शिवसेना तथा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना (शिंदे गट) यांना कळाल्यानंतर त्यांनीही तातडीने रात्री बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत आ. संजय गायकवाड यांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनाही कल्पना दिली. त्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हालचाल सुरू केली. घटनेचे गांभिर्य पहाता पोलिस अधीक्षकांनी बुलडाणा शहरचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, धामणगाव बढेचे ठाणेदार भोरकडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांना तातडीने बोराखेडी पोलिस ठाण्यात पाठवले. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असल्याची चर्चा आहे.