‘कुंभथॉन’च्या रमेश रासकर यांना एमआयटीचा पुरस्कार

बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (14:36 IST)
नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यात ‘कुंभथॉन’ तांत्रिक उपक्रमांतून मोठे योगदान देणारे संशोधक रमेश रासकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा लेमलसन एमआयटी फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख अमेरिकन डॉलर्स असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सध्या रासकर अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी माध्यम कला आणि विज्ञान विषयाचे सहायक प्राध्यापक आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मिडिया लॅबचे संस्थापक सदस्यही आहेत. तसेच फेम्टो फोटोग्राफी तसेच रॅडिकल इमेजिंग सोल्युशन्सचे रासकर हे सहसंशोधक आहेत.
 
कोपऱ्यांमध्येही सहज दिसणारा अल्ट्रा फास्ट इमेजिंग कॅमेरा, कमी खर्चातले आय केअर सोल्युशन्स, तसंच सूक्ष्मातलं सूक्ष्म पाहू शकणारा कॅमेरा याचा रासकर यांनी केलेल्या संशोधनात समावेश आहे. या संशोधनामुळं रासकर यांनी जगभरातल्या इतर संशोधकांना नवीन मार्ग दाखवला आहे. इमेजिंग, कॉम्प्युटर व्हिजन, मशीन लर्निंगमधले ते पायोनिअर समजले जातात. स्थानिक विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, संशोधन पूर्ण झालेले विद्यार्थी अशा एकूण शंभरेक विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी रासकर यांनी सहकार्य केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा