स्कार्लेट मृत्युप्रकरणी एनसीडब्ल्यूची स्वतंत्र चौकशी

रविवार, 30 मार्च 2008 (13:17 IST)
ब्रिटिश तरूणी स्कारलेट किलींग मृत्युप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे (एनसीडब्ल्यू) दोन सदस्यीय पथक गोव्यात पोहचले आहे. स्कार्लेटच्या आईने आपल्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर दिगंबर कामत सरकारने प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवली होती.

याप्रकरणी पोलिस व प्रशासनाच्या उदासीनतेवर महिला आयोगाने कोरडे ओढले असून सुरूवातीपासून प्रकरणाचा पाठवुरावा करत आहे. आयोगाने भारतीय व परदेशी महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान याअगोदर गोवा पोलिसांनी मादक द्रव्य देऊन बलात्कार केल्यानंतर समुद्रकिनार्‍यावर सोडून दिल्याच्या आरोपात बारटेंडर सॅमसन डिसुझा व मादक द्रव्यांचा डीलर प्लाकिडो कारव्हाल्होस अटक केली होती. किंलींगच्या संपूर्ण शरीरावर ओरखडे आढळून आले असून तोंड वाळूने भरल्याचे निष्पन्न झाले.

ती पाण्यात वाहून गेल्याची शक्यता फेटाळून लावताना तीच्या फुफ्फुसात समुद्राचे पाणीही आढळले नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याअगोदर स्कार्लेटची आई फिओना मॅकोनने सीबीआय चौकशीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. सुरूवातीस गोवा पोलिसांनी स्कार्लेट अपघाताने वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचे सांगिलते होते. मात्र प्रकरणाच्या पाठपुराव्यानंतर सत्य उजेडात आले होते.

वेबदुनिया वर वाचा