सुलोचनादीदींना 'महाराष्ट्र भूषण' जाहिर

वेबदुनिया

सोमवार, 30 नोव्हेंबर 2009 (19:52 IST)
MH News
MHNEWS
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा २००९ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत श्रीमती सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दिदी यांना जाहीर झाला आहे.

सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फ़ौजिया खान, पुरस्कार समितीचे सदस्य मोहन धारिया, अजित वाडेकर, मधुकर भावे आणि समितीचे सदस्य सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी उपस्थित होते.

सुलोचनादिदींचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. कै.भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचना दिदींची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

१९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टित सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसर्‍या पिढीबरोबर त्यांनी काम केले. त्यानंतर कपूर घराण्याच्या तिसर्‍या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीताबाली, बबिता, नितू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

५ लाख रुपये रोख, स्मृति चिन्ह, मानपत्र, शाल श्रीफ़ळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. २६ जानेवारीला सायंकाळी मुंबईत रविंद्र नाट्य मंदिर येथे होणार्‍या समारंभात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार सुलोचना दिदींना प्रदान करण्यात येणार आहे.

यापूर्वी पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, रतन टाटा, मंगेश पाडगावकर, नानासाहेब धर्माधिकारी, अभय व राणी बंग, विजय भटकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा