संदीप कर्णिक यांना ‘क्लीन चिट’

शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (15:32 IST)
मावळ गोळीबारप्रकरणी याचिकेवर राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने संदीप कर्णिक यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. 
 
पवना धरणाच्या पाण्यासाठी ८ ऑगस्ट २०११ रोजी शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक व इतर अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली होती. कर्णिक यांनी जाणीवपूर्वक गोळीबाराचे आदेश दिले़ तसेच त्यांच्या गोळीने एका महिलेचाही जीव गेला़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. 
 
दरम्यान, याबाबत खातेनिहाय चौकशी केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने न्यायालयात सादर केले़ जमावाला आटोक्यात आणण्यासाठीच कर्णिक यांनी रबराच्या गोळ्यांचा वापर करुन हवेत गोळीबार केला होता. याबाबत पोलिसांना समजही देण्यात आली असल्याचे यामध्ये म्हणण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा