शह-काटशहासाठी 'सोनियाचा' मुहूर्त

महेश जोशी

मंगळवार, 18 मार्च 2008 (10:37 IST)
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर व मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेल्या अनेक वर्षापासून लातूर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. ते एकमेकांना ओळखतातच नाहीत तर ते अनेक वर्षापासून एकाच पक्षात सोबत काम करीत आहेत. असे असतानादेखील शिवराज पाटील चाकुरकर उस्मानाबाद येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चक्क नावच चुकले. विलासराव देशमुख ऐवजी विलासराव चव्हाण असा विलासरावांचा नामोल्लेख केला. पक्षांतर्गत मतभेदातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर होत होती.
शिवराज पाटील चाकुरकर यांचे खंदे समर्थक माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचा साधा उल्लेखही मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला नाही. उस्मानाबाद मतदार संघाचा सध्या खुला गटात समावेश झाला आहे. जिल्ह्यातून काँगे्रसच्या वतीने लोकसभेसाठी बसवराज पाटील दावेदार मानले जातात. लातूर लोकसभा मतदार संघ आरक्षित झाल्याने मुख्यमंत्री देशमुख व गृहमंत्री पाटील यांचा उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर डोळा आहे. नेमक्या याच कारणामुळे मेळाव्यात हा मतभेद उफाळल्याचे बोलले जात होते.
विलासरावांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत दिमाखदार भाषण केले, असा टोलाही प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी आपल्या भाषणात लगावला.
एकंदरीतच काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी व कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यातही काँग्रेरस पक्षांतर्गत वाद लपून राहिला नाही.

वेबदुनिया वर वाचा