माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचा कार्यक्रम २६ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व जिल्हे तसेच ब्लॉकमध्ये लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचा कार्यक्रम विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात यावा, अशी सूचना प्रदेश काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी संबंधित कमिटीच्या अध्यक्षांना पत्र पाठवून केली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विविध विषयांवर चर्चासत्र, देशाच्या व राज्याच्या प्रगतीमधील त्यांचे योगदान या विषयावर व्याख्याने, रक्तदान शिबिर, रुग्णालयात जाऊन गरीब व गरजू रुग्णांना वस्त्रे व फळेवाटप, आरोग्य तपासणी शिबिर, गरीब व गरजू मुलांना संसारोपयोगी वस्तूूंचे वाटप, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम आयोजित करावेत, अशी सूचना प्रदेश कॉंग्रेसने पाठविलेल्या या पत्रातून करण्यात आली आहे. घेतलेल्या उपक्रमांबद्दल वृत्तपत्र कात्रणांसह अहवाल तयार करून तो प्रदेश काँग्रेसकडे पाठवावा, असेही जिल्हा तसेच ब्लॉक कमिट्यांना कळविण्यात आले आहे.