वारकर्‍यांच्या आषाढीत आंदोलनाचा इशारा

बुधवार, 1 एप्रिल 2015 (12:23 IST)
चंद्रभागेच्या वाळवंटात तंबू, राहुटय़ा उभारण्याबाबत शासनाने सर्वोच्च न्यायालयात वारकर्‍यांच्यावतीने बाजू न मांडल्यास आषाढी यात्रेमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सर्व वारकरी व महाराज मंडळींनी मोर्चाद्वारे दिला. 
 
पंढरीतील अस्वच्छतेबाबत दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने वाळवंटात कामस्वरुपी व तात्पुरत्या बांधकामास, चार चाकी वाहन, जनावरे यांना परवानगी नाकारली आहे. याचा मोठा फटका वारकर्‍यांना बसला आहे. पंढरीत भरणार्‍या चार प्रमुख यात्रेमध्ये   जवळपास एक लाख भाविक वाळवंटात मुक्काम ठोकतात. तसेच विविध महाराज मंडळींचे फड वाळवंटात उभे असतात. येथेच रात्रं-दिवस भजन, कीर्तनाचा जागर सुरू असतो. पण न्यायालयाच्या निकालामुळे वाळवंटात केवळ भजन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वर्षानुवर्षाची परंपरा मोडीत निघणार असल्याचा आरोप महाराज मंडळींनी केला आहे. इतिहासात प्रथमच यंदाची वारी वाळवंटात भरली नाही. यावरुन वारकरी व प्रशासन संघर्ष सुरू झाला आहे. 
 
याला विरोध दर्शविण्यासाठी समस्त महाराज मंडळींनी प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार येथून हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो वारकरी टाळ व भगव्या पताका घेऊन सामील झाले होते. 

वेबदुनिया वर वाचा