राज पुन्हा सक्रिय

गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (11:39 IST)
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर 'बॅकफूट'वर गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांनी आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आवाज उठवला असून त्यांनी ऊस दरासाठी पुढाकार घेत राज्यपालांना पत्र लिहिले आहे. टोल आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पहिला हप्ता २५00 रुपये, तर अंतिम हप्ता ३000 रुपये द्यावा, अशी मागणी केली आहे. त्याबाबत त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले आहे. राज ठाकरे यांनी ऊस दराबाबत राज्यपाल विद्यासागर राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र उसाचा पहिला हप्ता आणि अंतिम दर अद्याप जाहीर झालेला नाही. कारखाने झपाट्याने ऊस तोडून नेत आहेत. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. वाढत्या महागाईमुळे रासायनिक खतांचे दर, बी-बियाणे, पाणीपट्टी, वीज बिल व मजुरी इत्यादीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. निसर्गाच्या असमतोलपणामुळे अवकाळी पाऊस, गारपीट आदीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाचा भाव ठरला पाहिजे. उसाला प्रतिटन पहिला हप्ता २५00 रुपये तर अंतिम दर ३000 रुपये द्यावा, जेणेकरून शेतकरी समाधानी होईल. पहिला हप्ता शेतकर्‍यांना १0 दिवसांच्या आत देण्यात यावा, तसेच साखरेचा बाजारभाव बघता उसाला प्रति टन तीन हजार रुपये दर देण्यास साखर कारखान्यांना कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आपण यात वैयक्तिक लक्ष घालून ऊस दर त्वरित जाहीर करण्यासाठी संबंधित विभागास आदेश द्यावेत, असे राज यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा