राज्यात अतिवृष्टीची शक्यता

बुधवार, 25 मे 2016 (11:38 IST)
राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हवामान खात्याने राज्य शासनाला कळविले आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पावसाच्या अंदाजाची माहिती दिली. त्यानुसार गेल्या ५० वर्षांतील पावसाच्या सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस पडू शकतो. दुष्काळाने होरपळत असलेल्या राज्यात प्रशासन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करीत असतानाच संभाव्य अतिवृष्टी व त्यातून येणारा ओला दुष्काळ यावर मात करता यावी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवावी लागत आहे.

आरोग्य, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, जलसंपदा आदी विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा