यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला निराशा

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (10:21 IST)
केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आज सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प महाराष्ट्राची घोर निराश करणारा आहे. रेल्वेला सर्वाधिक महसूल महाराष्ट्राकडून मिळतो. देशात रेल्वेतून प्रवास करणा-या एकूण प्रवाशांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवासी मुंबई आणि महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. तसेच केंद्रीत रेल्वे मंत्री हे महाराष्ट्रातील असल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसाठी व महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी झुकते माप मिळेल अशी अपेक्षा होती मात्र, ती साफ फोल ठरली आहे. 
 
नाशवंत कृषी मालाची वेगाने वाहतूक करण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनची घोषणा होईल ही अपेक्षाही फोल ठरली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचे कोणत्याही ठोस निर्णय या अर्थसंकल्पात घेतलेले नाही. या अर्थसंकल्पात नवीन गाड्यांची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात रेल्वे स्थानकांना कंपन्याचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, हा निर्णय योग्य नसून त्यामुळे त्या शहरांची अस्मिता नष्ट होणार आहे. त्यामुळे यंदाचा हा रेल्वे अर्थसंकल्प खाजगी कंपन्याच्या हिताच्या दृष्टीने अधिक लक्ष देणारा असल्याची टीका करत छगन भुजबळ यांनी सामान्य जनतेला घोर निराश करणाऱ्या अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा