यंदाचे साहित्‍य संमेलन महाबळेश्‍वरला

वेबदुनिया

रविवार, 16 नोव्हेंबर 2008 (17:20 IST)
यंदाचे 82 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन महाबळेश्‍वर येथे घेण्‍याचा निर्णय मराठी साहित्‍य महामंडळाने घेतला असून महामंडळाचे अध्‍यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी याबाबतची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेतून केली. या संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहे.

साहित्‍य संमेलनासाठी रत्‍ना‍गिरीत होणार अशा वावड्या गेल्‍या काही दिवसांपूर्वी निघाल्‍या होत्या. तर यासाठी परभणी आणि ठाणे यांनी सुरुवातीला तयारी दर्शविली होती. मात्र नंतर आपल्‍याला शक्‍य नसल्‍याचे जाहीर केले होते. नंतर पुण्‍यातील त्रिदल संस्‍थेतर्फे आणि महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेच्‍या महाबळेश्‍वर शाखेतर्फे महामंडळाकडे निमंत्रण आल्‍याने महाबळेश्‍वरचे नाव निश्चित करण्‍यात आले.

या संमेलनासाठी अध्‍यक्षपदाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची अंतिम मुदत एक डिसेंबर सायंकाळी सात वाजेपर्यंत आहे. उमेदवारी मागे घेण्‍यासाठी पाच डिसेंबर ही मुदत असून अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा