मुंबईत पाऊस, तीन दिवसांत संपूर्ण राज्यात सक्रीय होणार

बुधवार, 2 जुलै 2014 (14:35 IST)
जून महिना कोरडा गेल्यानंतर आज (बुधवार) सकाळपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगडमध्ये पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. तीन तासांत मुंबईत 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गटारी तुंबल्या आहेत.
 
गेल्या महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस हा तीन तासात मुंबईत झाला. घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये पावसाचं पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात दैना उडाली आहे. मुंबईतल्या चुनाभट्टी येथे सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. कुर्ला येथे पाणी भरल्याने हार्बरची सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे गाड्या उशीराने धावत आहेत.
 
अंधेरीजवळील वेस्टर्नवरील मेट्रोच्या एक्सप्रेस हायवे स्टेशनजवळ पाणी साचल्याने वाहतूक कोंडी थप्प झाली आहे. या सोबतच भांडूप ते घाटकोपर एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
 
एक महिना उशीरा का होईना पाऊस कोसळत असल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता तरी दमदार पाऊस पडू देत अशी अपेक्षा सगळेजणच व्यक्त करताना दिसत आहे. 
 
येत्या दोन तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

वेबदुनिया वर वाचा