मुंबईतील मेट्रोच्या डब्यात पाणीगळती

गुरूवार, 3 जुलै 2014 (16:29 IST)
मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पहिल्या मेट्रोचे पितळही उघडे पडले आहे. एका मेट्रो गाडीच्या डब्यात चक्क पाणीगळती होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तब्बल 4321 कोटी रुपये खर्चून जागतिक स्तरावरील मेट्रो प्रकल्प उभारल्याचा दावा करणार्‍या रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडून स्पष्टीकरण मागवावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्य सचिव जे. एस. सहारिया आणि एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबईतील पहिल्यावहिल्या वातानुकूलित मेट्रो सेवेचा आनंद घेणार्‍या अनेक प्रवाशांनाही पाणी गळतीचा फटका बसला. काही प्रवाशांनी हे दृश्‍य मोबाइलच्या कॅमेर्‍यात टिपून 'यू ट्यब'वर व्हिडीओ अपलोडही केला आहे. हा व्हिडीओनंतर व्हॉट्‌स अॅपवरही तो मोठ्याप्रमाणात पाहाण्यात आला.

मेट्रो सेवेतील 16 पैकी एका ट्रेनच्या वातानुकूलन यंत्रणेत लिकेज झाले होते. पावसाच्या मार्‍यामुळे पाण्याची गळती सुरू झाली. प्रशासनाच्या लक्षात येताच ही गाडी प्रवास पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात आली आणि राखीव गाडी सेवेत आली आहे.  

वेबदुनिया वर वाचा