मनसे व काँग्रेस एकत्र येणार काय?

FILE
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी सरकार हाकताना विकासात अडथळे निर्माण होत आहेत, तर मग आघाडी करायला सांगितले कुणी, असा सूचक सवाल मुख्यमंत्र्यांना करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय चर्चेस उधाण आणले आहे.

राज ठाकरे यांनी असे वक्तव्य करून भविष्यातील राजकीय समीकरणाची दिशा तर सुचवली नाहीना? कारण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी राज्यात सेना, भाजप महायुतीचा जप करत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसही या महायुतीत सामील होण्याचे निमंत्रण मिळाले होते. मात्र राज ठाकरे यांनी आपणांस महायुतीत सामील व्हायचे नसून स्वबळावर सत्तेत येण्यासाठी राज्यात संघर्ष करायचा असल्याचे स्पष्ट केले होते. म्हणजेच मनसेस राज्यातील राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण करायचे आहे. बड्या पक्षाच्या वळचणीला जाऊन फक्त सत्तेचा स्वार्थ साधायचा नसून कॉंग्रेसारख्या पक्षाच्या साथीने सत्तेवर यायचे असल्याचेच सूतोवाच त्यांनी केले आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षास सोबत घेऊन सत्ता गाठायचे निश्चित केले होते. मात्र भाजप राज्यात शिवसेनेचा साथ सोडण्यास तयार नाही. मनसेने शिवसेनेसोबत हातमिळवणी केल्यास मनसेच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. कारण शिवसेनेचा जोर कमी पडत असताना राज्याच्या राजकारणात रिक्त होणारी पोकळी मनसे भरून काढत आहे. सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्होट बँकेस तडा देण्यावरच मनसेचा विस्तार अवलंबून आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या दौर्‍याच्या झंझावातात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्रमकपणे हल्ला चढवला. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या पायास ते खिंडार पाडू शकणार नाही मा‍त्र मराठवाडा, विदर्भ, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात राष्य्रवादीने पाय जमवू नये, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून या भागातच मनसेचा झपाट्याने विस्तार होईल, हे राज यांना ठाऊक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्याचा गाडा हाकणे काँग्रेसला कठिण झाले आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे प्रचंड घोटाळे इतक्यात चव्हाट्यावर आले. प्रचंड आर्थिक उलाढाल असणारी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच आहेत. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका स्वीकारून काँग्रेसला राज्यात पछाडण्याचे डावपेचही खेळले आहेत. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे राज्य सरकार जनतेच्या अपेक्षेस अपात्र ठरते आणि मुख्यमंत्रिपद असल्याने अपयशाचे खापर काँग्रेसवर फुटते, असा सूर कॉंग्रेसच्या गोटातून उमटत असते. मात्र सद्या पर्याय नाही म्हणून नाईलाजाने आघाडीचा संसार सुरू आहे. राज ठाकरे यांच्या रूपाने राज्यात तो पर्याय उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षच मनसेचा नैसर्गिक साथीदार होऊ शकते. काँग्रेस व मनसेने या बाजूवर निश्चितच विचार केला असणार. कदाचित तशी खलबतेही झडली असणार. म्हणूनच राज यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरते.

वेबदुनिया वर वाचा