मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात आज गारपिटीची शक्यता

शनिवार, 5 मार्च 2016 (11:38 IST)
भारतीय हवामान खात्याचा अंदाज
rain
मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातील जिल्ह्यांमध्ये शनिवार, 5 मार्च रोजी सकाळपासून पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी या कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
 
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदूरबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली तसेच मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
 
या कालावधीत गारपीट सुरू असताना नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, ज्या धान्याची कापणी झालेली आहे, ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, गारपीट सुरू असताना विजेच्या तारा तुटण्याची शक्यता असते, त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा