पंतप्रधान नागूपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करणार

गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (17:47 IST)
उपराजधानीला ८ हजार ६८० कोटी रुपयांचा ३८.३१ कि.मी. लांबीचा बहुप्रतीक्षित नागूपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आज २१ ऑगस्टला  सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्कवर जाहीर कार्यक्रमात भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमात पारडी नाका उड्डाण पूल, नवीन रस्ता दुभाजकासह इतरही कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्यासह केंद्रीय नगर विकास मंत्री एम.वेंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यासह अन्य मंत्री आणि राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तसेच केंद्र आणि राज्यातील ऊर्जा, नगर विकास आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित राहतील. पण नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदान परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा फज्जा उडण्याची शक्‍यता दिसून येत आहे. पावसामुळे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेची तारांबळ उडाली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा