नेता निवडीचे अधिकार उद्धव ठाकरेंकडे

मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (11:42 IST)
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची पहिली बैठक काल दुपारी दादर येथील शिवसेना भवनात पार पडली. मात्र त्यात गटनेतेपदी कुणाचीच निवड करण्यात आली नाही. त्या ऐवजी काँग्रेसच्या स्टाईलीत नेता निवडीचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे देण्याचा ठराव करण्यात आला. 
 
उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना हे स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकार स्थापनेच प्रक्रियेत शिवसेना अद्याप सहभागी झालेली नाही. ते म्हणाले की, मी कुणाकडेच कसला प्रस्ताव घेऊन जाणार नाही. समोरून काही प्रस्ताव आल्यास आपण सरकारमध्ये जाण्याबाबत, सहभागी होण्याबाबत अथवा पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेऊ, शिवसेनेने आणखी काही काळ या संदर्भात वाट पाहण्याचे ठरवले आहे.
 
ठाकरेंच्या आधी बोलताना ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी पक्षाच्या निवडणूक मोहिमेवर भाष्य केले. सर्वाच्या विरोधात लढताना या एवढय़ा जागा मिळालेल्या आहेत त्यासाठी शिवसैनिकांनी अपार कष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या नेतेपदाबाबतचे सारे निर्णय आता या पुढे उद्धव ठाकरे हेच घेतील.
 

वेबदुनिया वर वाचा