जळगावचा विजय चौधरी डबल ‘महाराष्ट्र केसरी’

सोमवार, 11 जानेवारी 2016 (09:43 IST)
नागपूर- अत्यंत चुरशीच्या झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये जळगावच्या विजय चौधरीने बाजी मारली आहे. मुंबईच्या विक्रांत जाधववर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा यंदाही स्वत:कडे राखण्यात विजयला यश आले आहे.

डबल ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला म्हणजेच सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा विजय हा सहावाच पैलवान आहे. विजय चौधरीने विक्रांतचा 6-3 ने पराभव केला. चौधरीला रोख रक्कम आणि गदा देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2016 च्या विजेत्यास थेट पोलीस दलात घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे विजय चौधरी हा आता महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होणार हे नक्की झाले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली होती. अहमदनगरचा केवल भगारे याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
 
मॅट विभागातून मुंबईच्या विक्रांत जाधवने अंतिम फेरीत पुण्याच्या महेश मोहोळचा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर दुसरीकडे माती विभागातून जळगावच्या विजय चौधरीने सोलापूरच्या बाला रफिक शेखवर मात करत महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी दंड थोपटले होते.
 
पराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने 59व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. दंगलखोर प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
चिटणीस पार्कवर शनिवारी सायंकाळी पुणे शहरचा महेश मोहोळ आणि पुणे जिल्ह्याचा राहुल खणेकर या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरी गादी गटातील चुरशीची लढत झाली होती. एवढी घटना सोडता ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
मॅट विभाग 86 किलो
सुवर्ण- विक्रम शेटे, नगर
रौप्य- अनिरुद्ध पाटील, कोल्हापूर
 
माती विभाग 86 किलो
सुवर्ण- दत्ता नरळे, सोलापूर,
रौप्य- नाशिर सय्यद, बीड
कांस्य- हर्षवर्धन थोरात, सांगली
 
माती विभाग 70 किलो
सुवर्ण- अशफाक शाहर, औरंगाबाद
रौप्य- विकास बंडगर, सोलापूर
कांस्य- बाबासाहेब डोंबाळे, पुणे जिल्हा

वेबदुनिया वर वाचा