गडकरींसाठी आमदारकी सोडतो : खोपडे

शनिवार, 25 ऑक्टोबर 2014 (10:56 IST)
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र  फडणवीस आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा राज्यात पाठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गडकरी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठविले जाणार असेल, तर त्यांच्यासाठी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार कृष्णा खोपडे यांनी दर्शविली. दुसर्‍यांदा आमदार झालेले खोपडे नागपूर-पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत.
 
‘गडकरी यांना मुख्यमंत्री करावे,’ या मागणीसाठी भाजपच्या विदर्भातील 39 आमदारांनी मंगळवारी रात्री गडकरींची भेट घेतली होती. ‘त्यांना माझ्याविषयी आदर आहे आणि मी मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणीही त्या आमदारांनी केली आहे. मात्र, राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा न येण्याची माझी भूमिका यापूर्वीही सांगितली आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेला आदेश मला मान्य असेल,’ असे गडकरींनी काल सांगितले होते. या सर्व घडामोडींविषयी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

वेबदुनिया वर वाचा