कुडाळमध्ये नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धूळ

सोमवार, 18 एप्रिल 2016 (16:32 IST)
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला धूळ चारत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकूण 17 जागा असलेल्या या नगरपंचायतीमध्ये 9 जागांवर नारायण राणेंच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने विजय मिळवत सत्ता काबीज केली. दुसरीकडे शिवसेनेला अवघ्या 6 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर भाजप आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.

 मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी कुडाळ शहरामध्ये वैभव नाईक यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर मतदारांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्याच बाजूने कौल दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा