कांद्याचे दर घसरले; जबाबदारी कोण घेणार

शनिवार, 4 जुलै 2015 (12:36 IST)
केंद्र सरकार कुणासाठी काम करीत आहे, कांद्याचे निर्यातीचे दर वाढवल्यामुळे लासलगावच्या मार्केटमध्ये कांद्याचे स्थानिक विक्रीचे दरही कोसळले याची जबाबदारी कोण घेणार असे सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत असे सांगताना चव्हाण म्हणाले की, कांद्याचा निर्यातीचा दर सतरा हजार रुपये प्रतिटन होता तो केंद्राने 27 हजार रुपयांवर नेला आहे
 
जे कांद्याचे झाले तेच उसाचेही सुरू आहे. उसाला राज्य सरकार मदत देणार असे मुख्यमंर्त्यांनी सांगितले प्रत्यक्षात टनामागे दोनशे रुपयांच्या आसपास व तेही काही ठरावीकच कारखान्यांना पैसे मिळणार आहेत. साखरेचे भाव 1800-1900 रुपयांवर प्रति क्विंटल  गेलेले असताना उसाला 2100 रुपये भाव द्या असा आग्रह राज्य सरकार कसा धरत आहे काही समजत नाही असेही चव्हाण म्हणाले. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत मात्र त्यांना दिलासा देण्यात सरकार काहीही करीत नाही. शेतकर्‍यांची कर्जे माङ्ख केली जाणार या आशेवर अनेक शेतकरी जीव तगवून होते पण आता तीही आशा संपल्याने आत्महत्या करतो असेच एका शेतकर्‍याने लिहून ठेवले आहे. असे सांगून चव्हाण म्हणाले की जोवर हे सरकार शेतकर्‍यांची कर्जे माफ करणार नाही तोवर आमचे आंदोलनही सुरू राहील विधानसभेचे कामकाज 13 जुलैला सुरू होईल, पहिला दिवस शोक प्रस्तावाचा असेल मात्र 14 जुलैपासून आम्ही सभागृहाचे कामकाज रोखून ठेवणार आहोत असेही अशोक चव्हाण म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा