एखादा अधिकारी जेव्हा अकम करतो तेव्हा तो उदाहरण निर्माण करतो. असेच काम केले आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांनी स्वतः आज स्वतः श्रमदान करत त्यांनी एका महिलेला तिचे शौचालय बांधण्यासाठी मदत केली आहे. असे घडले आहे त्र्यंबकेश्वर येथे. त्र्यबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावच्या निराधार महिला मंदाबाई जाधव यांच्या घरी शौचालय बांधण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी श्रमदान केले. ग्रामस्थांमध्ये यामुळे उत्साह निर्माण झाला असून येत्या महिन्याभरात गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रमदान केले. पालघर आणि नाशिकच्या सीमेवरील आदिवासी गाव असलेल्या या गावात एकूण 307 कुटुंबांपैकी 100 कुटुंबांनी शौचालय बांधले आहे. मजूरांची उपलब्धता नसल्याने आणि साधनसामुग्री तालुका स्तरावरून आणावी लागत असल्याने शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर श्रमदानाद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी गावात आले.शौचालयासाठी आवश्यक चार फूट खोलीचे दोन खड्डे खोदण्याचे काम दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार महेंद्र पवार, गट विकास अधिकारी एम.बी.मुरकुटे , सरपंच कल्पना जाधव यांनीदेखील श्रमदानात सहभाग घेतला. श्री.शंभरकर आणि श्रीमती संगमनेरे हे शौचालय बांधण्यासाठी खर्च करणार असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून विधवा असलेल्या मंदाबाईंना आर्थिक मदत होणार आहे.शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनी श्रमदानाद्वारे पुढाकार घ्यावा, असे आवाहन राधाकृष्णन यांनी केले. प्रत्येकाला शौचालयाचा हक्क मिळूवन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात साधनसामुग्री आणि मनुष्यबळाच्या समस्या येतात. मात्र श्रमदानाच्या माध्यमातून त्यावर मात करता येते हे नागरिकांना पटवून देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात पुण्याखालोखाल नाशिक जिल्ह्याने शौचालय बांधण्यात चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी जिल्ह्याला 75 हजार शौचालय उभारण्याचे उद्दीष्ट असताना 95 हजार 893 शौचालय उभारण्यात आली आहेत. 400 गावांचे उद्दीष्ट असताना 451 गाव हागणदारीमुक्त झाले आहेत. पुढीलवर्षी 640 गावाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहितीदेखील श्री.शंभरकर यांनी दिली.