अडीच एकर शेतीसाठी चौघांची निर्घृण हत्या

मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:25 IST)
बाळापूर तालुक्यामधील बाखराबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अवघ्या अडीच एकर शेतीच्या वादातून भगवंतराव आणि विश्वनाथ माळी या दोन भावांच्या कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये माळी कुटुंबियांमधील एका महिलेसह चौघांचा समावेश आहे.

1998 मध्ये भगवंतराव माळी यांनी गजानन माळी यांच्याकडून अडीच एकर शेती खरेदी केली होती. मात्र त्यानंतर गजानन यांनी शेतीची खरेदी करुन देण्यास टाळाटाळ केली आणि अखेर हा वाद कोर्टात गेला होता. नुकताच याप्रकरणी हायकोर्टाने भगवंत माळी यांच्या बाजूने निकाल दिला.

निकाल आपल्या विरोधात लागल्याचा राग मनात ठेवत सोमवारी सायंकाळी गजानन माळी यांनी त्यांच्या दोन मुलांसह भगवंत माळी यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. यामध्ये विश्वनाथ बळीराम माळी (75), राजेश भगवंतराव माळी (37), योगेश भगवंतराव माळी (27) आणि वनमाला विश्वनाथ माळी (45) यांचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे ही सर्व घटना गावांतील नागरिकांसमोर घडली. मात्र, भीतीमुळे मदतीसाठी कोणीही सरसावले नाही. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गजानन माळी आणि त्यांचा मुलगा नंदेश याला अटक केली आहे. तर दीपक गजानन माळी हा आरोपी फरार झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा