सोनीने दिला आठ हजार कर्मचार्‍यांना नारळ

मंगळवार, 9 डिसेंबर 2008 (18:49 IST)
आतापर्यंत अमेरिका आणि युरोपमध्ये पसरलेली आर्थिक मंदी आता आशिया खंडातील कंपन्यांच्या दारावर येऊन धडकली आहे. याचा पहिला फटका सोनी या बड्या कंपनीला बसला असून कंपनीने आपल्या आठ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला आहे.

एवढेच नव्हे तर कंपनीने अनेक क्षेत्रातील गुंतवणूकही मागे घेतली असून १.१ अब्ज डॉलर्सपर्यंत खर्च कपात करण्याचे ठरविले आहे. पण या सगळ्यांपेक्षाही आठ हजार जणांना काढून टाकण्याचा निर्णय फारच धक्कादायक ठरला आहे. आशियात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करणारी सोनी ही पहिलीच कंपनी आहे. सोनी सध्या अनेक व्यावसायिक संकटांचा सामना करत आहे. प्रतिस्पर्धी एप्पलचा आयपॉडच्या तुलनेत सोनी मागे पडली आहे, तर फ्लॅट स्क्रीन टिव्हीच्या विक्रीतही फारसा फायदा झालेला नाही.

सोनीने आता केलेली कपात सीमीत आहे की हा फक्त 'ट्रेलर' आहे, याविषयी तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह दर्शविले आहे. कंपनीचे जगभरात १ लाख ८६ हजार कर्मचारी आहेत. कंपनी चित्रपट निर्मितीपासून व्हिडीओ गेम्सपर्यंत विविध व्यवसायात आहे. त्यामुळेच आणखी कर्मचारी कपात होण्याची शक्यताही तज्ज्ञ नाकारत नाहीत. 'सोनीची कर्मचारी संख्या मोठी आहे. त्यामुळेच कर्मचारी कपात अजूनही होण्याची शक्यता आहे. सध्या सोनीच्या हातात नियमित फायदा देणारा कोणताही महत्त्वाचा व्यवसाय नाही, असे कतसुशिको मोरी या डायवा एसबी कंपनीच्या फंड मॅनेजरने सांगितले. आता नोकरकपातीनंतर व्यवसाय वाढविण्यासाठी सोनी काय करेल हे पहावे लागेल, असेही ते म्हणाले.

सोनीच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण झाली आहे. वर्षभरात या शेअर्समध्ये ७० टक्क्यांनी घसरण झाली. नोकरकपातीच्या घोषणेनंतर शेअर्स ३. ९ टक्क्याने बंद होऊन १ हजार ८९६ येनवर बंद झाले.

वेबदुनिया वर वाचा