जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतर आज पुन्हा जेट एअरवेजने आपल्या काही कर्मचाऱ्यांना नारळ दिले असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्के कपात करण्यात आली असून, पुढील वर्षभरापर्यंत कर्मचाऱ्यांना कमी वेतनात काम करावे लागणार आहे.
नेमके किती जणांना काढण्यात आले हे सांगण्यास कंपनीने नकार दिला असून, मुंबईत झालेल्या हल्ल्यांचा फटकाही कंपनीला बसल्याचे जेटने स्पष्ट केले आहे.
ऑक्टोबरमध्ये कंपनीने एकदाच शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली होती, परंतु यानंतर देशभरात जेटविरोधात वातावरण तयार झाल्याने जेटने या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा जेटने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.