राज्यसभेचे महाराष्ट्रातील उमेदवार ठरले; बघा, कुठल्या पक्षाचे कोण आहेत उमेदवार?

मंगळवार, 31 मे 2022 (08:37 IST)
राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने एक, काँग्रेसने एक आणि भाजपने तीन नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून तिसऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
 
राज्यसभेसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रविवारी १६ नावांची घोषणा केली. त्यामध्ये महाराष्ट्रातून विनय सहस्रबुद्धे यांचा पत्ता कापताना वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी खासदार धनंजय महाडिक आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना संधी दिली आहे.शिवसेनेने यापूर्वीच विद्यमान खासदार संजय राऊत यांना पुन्हा संधी दिली आहे. तर कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते आणि प्रसिद्ध ऊर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे.
 
राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना भाजपने तीन उमेदवारांना उमेदवारी दिल्याने सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसने यंदाही राज्या बाहेरील व्यक्तीला राज्.सभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यासंदर्भात काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत पाचारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळत नसल्याची नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उघड बोलून दाखविली होती. याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल कयास लावले जात आहेत.
 
 शिवसेना ; - संजय राऊत, संजय पवार 
भाजपा - पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक 
कॉंग्रेस - इम्रान प्रतापगढी 
राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल
 
भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
 
या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती