राजेंद्र गुढा : अशोक गेहलोतांच्या या माजी मंत्र्याने उमेदवारीसाठी काँग्रेस-भाजपा ऐवजी एकनाथ शिंदेंची शिवसेना का निवडली?

सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (10:09 IST)
निवडणुकीच्या अगदी अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानच्या दौऱ्यावर येत प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. पण तो प्रचार भाजपसाठी नसणार आहे. तर ते प्रचार करणार आहेत शिवसेनेचा राजस्थान मधला एकमेव उमेदवार असणाऱ्या राजेंद्र गुढांचा.
 
एरवी राजस्थानच्या निवडणुकीत फारसा चर्चेत नसणाऱ्या उदयपूरवाटी मतदारसंघाला यंदा मात्र अचानक महत्त्व प्राप्त झालं आहे. इतकं की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत इथं प्रचारासाठी दोनदा भेट देणार आहेत. त्याला कारणीभूत ठरला आहे तो हा शिवसेनेचा उमेदवार राजेंद्र सिंह गुढा.
 
कोण आहे राजेंद्र गुढा?
हे राजेंद्र गुढा खरंतर गेहलोत सरकार मधले मंत्री. 55 वर्षांचे गुढा जवळपास 2008 पासून राजस्थानच्या राजकारणात सक्रीय आहेत. आधी काँग्रेस आणि मग बहुजन समाज पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली.
 
गेल्या निवडणुकीत ते बसपाकडून निवडून आले. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये सामिल होत मंत्री देखील झाले. पण सत्तेत असताना देखील अशोक गेहलोत यांचे मुख्य टिकाकार अशीच त्यांची ओळख राहिली.
 
अगदी ते सचिन पायलट यांच्या बाजुचे असल्याने गेहलोत यांना टार्गेट करतात असेही आरोप झाले.
 
पण तरीही त्यांचं मंत्रिपद कायम होतं. पण जुलै महिन्यात त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लाल डायरी बाहेर काढली आणि या आरोपांना आणि विरोधाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं.
 
या लाल डायरीमध्ये सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर साहजिकच त्यांची मंत्रिपदावरुन हाकालपट्टी झाली. आणि राजस्थानच्या राजकारणात गेहलोत यांच्या विरोधातील प्रमुख चेहरा अशी त्यांची ओळखही झाली. हे प्रकरण सुरु असतानाच साधारण सप्टेंबरमध्ये त्यांनी एकनाथ शिेदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
 
शिवसेनेचीच निवड का, याचं उत्तर देताना गुढा सांगतात, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साधे रिक्षाचालक होते. त्यापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत. ते शुन्यापासून इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या या कार्यक्षमतेवर मी प्रभावित झालो आणि त्यामुळे मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.”
 
काय आहे ही लाल डायरी?
हे लाल डायरी प्रकरण राजस्थानच्या निवडणुकीत 2020 पासून चर्चेत आहे. 2020 मध्ये मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या तीन जणांवर छापे पडले. त्यापैकी एक होते राजस्थानचे टुरीझम डेव्हलपमेंट ट्रस्ट अर्थात आरटीडीसीचे चेअरमन धर्मेंद्र राठोड.
 
या राठोड यांची ही लाल डायरी असल्याचा गुढा यांचा दावा आहे. हे राठोड मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय आहेत. राठोड यांना डायरी लिहायची सवय आहे. त्यांच्यावर जेव्हा छापे पडले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्यांच्या मदतीला पाठवलं आणि तेव्हाच आपण ही डायरी मिळवल्याचा गुढा यांचा दावा आहे.
 
पण हे प्रकरण बाहेर आलं ते जुलै 2022 मध्ये. त्याची सुरुवातही झाली ती गुढा यांच्याच एका वादग्रस्त वक्तव्यावरुन.
 
विधानसभेत भाषण करताना गुढांनी मणिपूरचा उल्लेख करत राजस्थान मध्येही महिला सुरक्षीत नसल्याचं वक्तव्य केलं. आणि त्यावरुन प्रचंड गदारोळ झाला. गेहलोत यांच्यावर टिका होत असतानाच त्यांनी हे लाल डायरीचं प्रकरण बाहेर काढलं.
 
गुढा यांच्या आरोपानुसार या डायरीत सरकारच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. जुलै महिन्यात काही पानं प्रसिद्ध केल्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी त्याची आणखी 4 पानं प्रसिद्ध केली आहेत.
 
या पानांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याचं कथित संभाषण आहे. या डायरी मधल्या उल्लेखानुसार, आपले वडिल हे अधिकाऱ्यांनी घेरले गेले आहेत आणि त्यामुळे ते या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करु शकत नाहीत असं वैभव गेहलोत म्हणत असल्याचा उल्लेख आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या लाल डायरीचा उल्लेख आपल्या भाषणात केला आहे. त्याबरोबरच भाजप नेते जे पी नड्डा आणि अमित शहादेखील डायरीबद्दल बोलतच आहेत.
 
भाजपने तर आपल्या निवडणुकीच्या भाषणांमध्ये जाहीरपणे आपण सत्तेत आलो तर लाल डायरीची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उदयपूरवाटी मतदारसंघात सभा घेत आपण काय काय कामं केली याचा पाढाच वाचला आहे. इतकंच नाही तर आपण उदयपूरवाटी हा मतदारसंघ दत्तक असल्याचंही जाहीर केलं आहे.
 
अर्थात डायरी, त्यातली पानं आणि आरोप यांची नुसती चर्चाच होते आहे. प्रत्यक्षात जुलैपासून आत्तापर्यंत राज्य किंवा केंद्र सरकारकडून या डायरीतल्या आरोपांची चौकशी झाली नाही. दुसरीकडे गुढांनी देखील इतक्या महिन्यात डायरीची सगळी पानं किंवा किमान महत्त्वाची पानं प्रसिद्ध केली नाहीत.
 
याबाबत बोलताना गुढा म्हणतात, “मी पानं प्रसिद्ध केली. आरोप केले. पण चौकशी मात्र होत नाहीये. त्यामुळे मी काही पानं प्रसिद्ध करुन थांबलो आहे. चौकशी होणार असेल तर सगळे पुरावे आणि डायरी देण्याची माझी तयारी आहे.”
 
पण याचा एकूण परिणाम होईल का याबाबत बोलताना वरिष्ठ पत्रकार नारायण बारेठ सांगतात,
 
“काँग्रेसने बऱ्यापैकी प्रचार करत हे भाजपचं षडयंत्र असल्याचं लोकांच्या मनावर बिंबवलं आहे. तसंच विरोधकांवर देशभरात होणाऱ्या धाडीचा मुद्दा देखील काँग्रेस कडून मांडला जात आहे.
 
आत्तापर्यंत या प्रकरणातून फारसं काही हाती लागलेलं नाही. त्यामुळे या डायरीच्या प्रकरणाचा आता निवडणुकीवर फारसा परिणाम होईल अशी शक्यता नाही.”
 
पण शिवसेनेचा राजस्थानमध्ये प्रभाव आहे का?
शिवसेनेचे राजस्थानमध्ये पदाधिकारी आहेत. गुढांना मात्र शिवसेनेची किंवा कुठल्या पक्षाची गरज आहे असं चित्र नाही.
 
आत्तापर्यंतच्या निवडणुका त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून लढवल्या आहेत. आणि जिंकतानाही बसपा नव्हे तर स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्याचा दावा ते थेट भाषणांमधूनही करतात.
 
शिवसेनेचं फारसं अस्तित्व नसताना गुढांनी शिवसेना का निवडली याबद्ल बोलताना वरिष्ठ पत्रकार नारायण बारेठ सांगतात,
 
“शिवसेनेची निवड करण्यातूनच हे स्पष्ट होतंय की यामागे भाजप आहे. गुढा हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विश्वासार्हता नाही. तसंच यापूर्वी त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढवली आहे.
 
त्यामुळे भाजपला त्यांना थेट प्रवेश देणं सोयीचं नव्हतं. त्यांचा फायदा होण्याऐवजी ती एक नवी जबाबदारी झाली असती. त्यामुळे शिवसेनेची निवड झाली असावी. एकनाथ शिंदे इथे यापूर्वी कधीही आले नव्हते. आणि यापुढेही येण्याची शक्यता नाही.”
 
अर्थात गुढा शिवसेनेत गेले असले तरी हे डायरी प्रकरण भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय.
 
काँग्रेसचे उदयपूरवाटी मतदारसंघाचे उमेदवार भगवान सैनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “या डायरीमध्ये काहीच नाहीये. ही डायरी अडीच वर्षांपूर्वी आली. मग गुढांनी ती दोन वर्षं स्वतः कडे का ठेवली. यापूर्वीच त्यांनी प्रसिद्ध का केली नाही. ते गप्प का राहीले? हे भाजपचं षडयंत्र आहे आणि त्यांनी भाजपसोबत मिळून हे रचलेलं आहे.”
 
 
काँग्रेस जरी असा दावा करत असलं तरी गुढांच्याविरोधात भाजपने उमेदवार दिला नाही असं नाही. या मतदारसंघात लढत होते आहे ती गुढा, सैनी आणि भाजपचा उमेदवार शुभकरण चौधरी यांच्यात.
 
गुढा तर काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत आपली लढाई थेट भाजप सोबतच असल्याचा दावा करतात.
 
अर्थात असं म्हणलं तरी निवडणुकीनंतर मात्र त्यांची इतर पक्षांना पाठिंबा देण्याची तयारी आहे. आणि हा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील असंही ते स्पष्ट करतात.
 
हे सांगतानाच गुढा राजस्थानचे निर्णय मात्र मला विचारूनच घेतले जातील, असं सांगायला विसरत नाहीत.
 
त्यामुळे सेना भाजपची ही राजस्थान मधली लढाई लुटुपुटुची आहे की खरी आणि ही लाल डायरी सेनेच्या उमेदवार असणाऱ्या गुढांना आणि भाजपला काही फायदा करुन देते का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 


















Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती