उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, यामुळे बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. यात विदर्भाच्या अनेक जिल्हय़ांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बऱ्याच खंडानंतर राज्यात पाऊस परतला असून, सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र दक्षिण ओरिसा ते उत्तर आंध्र किनारपट्टीदरम्यान असून, येत्या 24 तासांत ते पश्चिमेकडे प्रवास करीत दक्षिण ओरिसा ते दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने प्रवास करणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे.
सर्वदूर पाऊस
कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण, पूर्व, मध्य तसेच पश्चिमेच्या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पूर्व किनारपट्टीवरील बहुतांश राज्यांना ऑरेंज अलर्ट होता. बुधवारी विदर्भातील अनेक जिल्हय़ांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.