पिंपरी चिंचवड- कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय अंतर्गत महापालिका कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीवर मर्यादित कालावधीसाठी घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका सर्व कार्यालयांतील अधिकारी कर्मचा-यांची तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती 100 टक्के ठेवण्यास मान्यता दिली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार महानगरपालिका कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासन आदेशानुसार मर्यादित कालावधीसाठी महानगरपालिका कार्यालयांतील कर्मचा-यांची उपस्थिती 50 टक्के करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
कोरोना विषाणू महामारीचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 4 जून 2021 चे आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 द्वारे सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केलेली आहेत.