अनधिकृत नळ कनेक्शन तोडा, अन्यथा कारवाई; आयुक्तांचा अधिका-यांना इशारा

गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (17:11 IST)
भोसरी येथे कबड्डी, कुस्ती, फुटबॉल ग्राऊंडचे प्रलंबित काम स्थापत्य उद्यान विभागाने करावे. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.  
 
महानगरपालिकेच्या इ प्रभागामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण, वैद्यकीय, आरोग्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांबाबत नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य व अधिकारी यांच्या समवेत आज बैठक झाली. प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्य अजित गव्हाणे, संतोष लोंढे, सागर गवळी, नगरसदस्या भिमाबाई फुगे, सोनाली गव्हाणे, प्रियांका बारसे, इ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, मकरंद निकम, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, सुनिल वाघुंडे, रामनाथ टकले, राजेंद्र राणे, भोसरी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार आदी उपस्थित होते.
 
प्रभाग क्र. 5 आणि 7 मधील विविध समस्या नगसदस्यांनी मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने वीज पुरवठा खंडीत होतो.  फुटपाथवरील अतिक्रमण विरुध्द कारवाई करण्यात यावी. लांडेनगर येथील लसीकरणाची माहिती मिळावी.एमआयडीसीचे पाणी मिळणेबाबत नियोजन करावे, भोसरी ते दिघी 12 मीटर रोड पूर्ण करण्यात यावा.  मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.पाणी पुरवठा कामासाठी ठेकेदारांच्या कर्मचा-यांऐवजी महापालिका कर्मचा-यांची नेमणूक करण्यात यावी.  महात्मा ज्योतीबा फुले शाळेमधील नळ दुरुस्ती करण्यात यावी.  
 
भोसरी येथील राजमाता जिजाऊ कमानीचे काम व प्रशिक्षण केंद्राचे काम लवकर पूर्ण करावे. लांडेवाडी एमआयडीसी ड्रेनेज लाईन नाशिक रोडला जोडण्यात यावी.  भाजी मंडईचे काम त्वरीत करावे तसेच गाळे ताब्यात देण्यात यावे.  हॉकर्स झोनचे योग्य नियोजन करण्यात यावे.  गव्हाणे वस्ती येथील विद्युत केबलची दुरुस्ती करण्यात यावी. ड्रेनेज चोकअप काढण्यात यावे.  कोंडवाडा पुन्हा चालू करण्यात यावा.  खंडोबामाळ येथील पंपिंग हाऊस लिकेज काढण्यात यावे तसेच ड्रेनेजलाईनची दुरुस्ती करण्यात यावी. बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
 
शहरातील हॉकर्सचे नियोजन करण्याचे काम सुरु असून प्रत्येक भागाचा विचार करुन याबाबत व्यवस्थापन केले जाईल.अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करुन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिले.  मोशी येथे ऑनलाईन पध्दतीने लसीकरण केंद्र चालू करण्यात येणार असून लसीकरण टीम वाढविण्यात येणार आहेत. पाणी योजनेबाबत एमआयडीसी यांच्याशी चर्चा करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. डॉ. शैलजा भावसार यांनी बैठकीत माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती