शहरात बनावट चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल २ लाख रुपये मूल्याच्या या नोटा असून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यात या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, तस्करीच्या या बनावट भारतीय चलनी नोटा प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. अधिकार्यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले. प्रत्येकी ५०० रुपये मूल्य असलेल्या एकूण ४०० भारतीय बनावट चलनी नोटा ज्याचे दर्शनी मूल्य २ लाख रुपये आहे, त्या सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदीनुसार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या.
तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वर नमूद केलेल्या तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor